हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली (Chhagan Bhujbal Meet To Sharad Pawar) आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालच छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर २४ तास उलटच नाहीत तोच भुजबळ शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेल्याने चर्चाना उधाण आलं आहे. छगन भुजबळ सिल्वर ओकवर नेमका का गेले? पडद्यामागे काय राजकारण चाललं आहे याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही.
काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे आपल्या ताफा घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न भुजबळांकडून करण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये भुजबळांचा ताफा कैद झालाच आणि हि बातमी फुटली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी विरोधकांना कॉल करून मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला जाऊ नका असं सांगितल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी कालच केला होता. व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टिका केली होती.
भाजपची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, भुजबळ- पवार भेटीबाबत भाजपकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास मला माहिती आहे, त्यामुळे ते महायुतीला धक्का बसेल, असा कोणताही निर्णय घेणार नाही, त्या उलट ते महायुती कशी एकत्र राहिल याचा प्रयत्न नेहमी करतात अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मी देखील शरद पवारांना अनेक वेळा भेटलो आहे, त्यामुळे काही बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे या भेटीत काहीही राजकीय घडामोड नाही असं बावनकुळे यांनी सांगितलं.