हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजेंनी आज रायगडावरून मराठा आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. आज समाजाची वाईट परिस्थिती आहे. मग त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे मग मराठ्यांना नाही. मी राजकारणी नाही आणि राजकारण करत नाही. माझ्यावर काहीजण मध्यंतरी नाराज झाले होते. पण समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले
छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.