शिवसेना, भाजप की AIMIM? छत्रपती संभाजीनगर नेमकं कुणाचं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुलाल तिकडं चांगभलं…राजकारणातला हा अलिखित नियमच…म्हणूनच की काय शिंदेंच्या हाती सत्तेच्या चाव्या येताच औरंगाबाद म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar ) बहुतांश कट्टर शिवसैनिक आमदारांनी ठाकरेंना रामराम केला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि या मतदारसंघाचे तब्बल चार टर्म प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे शी दोनच नावं ठाकरेंच्या बाजूनं राहिली…छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेशिवाय पानही घालत नाही. म्हणूनच की काय 1999 पासून सलग चार टर्म या मतदारसंघावर खैरे यांच्या रूपाने भगवा फडकला. मात्र 2019 च्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमनं युती करून मुस्लिम आणि दलित वोट बँक आपल्याकडे खेचून आणल्याने मातब्बर आणि अनुभवी खैरेंचा पराभव होऊन इम्तियाज जलील एमआयएमकडून महाराष्ट्रातून दिल्लीत जाणारे पहिले खासदार बनले.

मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरला स्वतःचा असा आगळा वेगळा इतिहास आहे.. हिंदू मुस्लिम, मराठा ओबीसी असे बरेच फॅक्टर या मतदारसंघावर प्रभाव टाकत आलेत. कांग्रेस, शिवसेना, भाजप, एमआयएम, वंचित आणि बिआरएस अशा लहान मोठ्या साऱ्याच पक्षांचा जीव या मतदारसंघात अडकलाय. त्यासाठी प्रत्येकाने आपापली तयारीही सुरू केलीय. त्यामुळे मराठवाड्याच्या या राजधानीवर नक्की कोण झेंडा फडकवणार? महाराष्ट्राच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट टॉपिक का आहे? याच प्रश्नाचं घेतलेलं हे सविस्तर उत्तर!

इच्छुकांची भाऊगर्दी; यंदाच्या निवडणुकीतील सर्वात वादळी मतदारसंघ  Imtiaz Jaleel , Uddhav Thackeray

शिवसेना- भाजप युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ नेहमी शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे सेनेची ताकद कमी झाली असल्याचं म्हणत युतीत आता भाजपने ही जागा आपल्या वाट्याला यावी यासाठी कंबर कसलीय. केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यासाठी मागील सहा महिन्यांपासून मतदार संघात तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातही ही जागा आपल्या वाट्याला मिळावी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 2019 ची निवडणूक सोडली तर 22 वर्षांपासून मतदार संघातील जनतेचा कौल हा शिवसेनेच्या बाजूने राहिला आहे. हीच लाईन पुढे करत महायुतीमध्ये ही जागा आपल्याला सुटावी यासाठी शिंदे प्रेशर क्रिएट करू शकतात. असं झालं तर शिंदेंकडून मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे येत्या निवडणुकीत ताकद आजमवताना दिसू शकतात. त्यामुळे युतीत ही जागा कुणाला सुटणार यावरून निवडणुकीच्या प्रचाराची आणि मतदारांचा कल नक्की कसा राहील? या सगळ्यांची गणित अवलंबून असतील.

आता वळूयात महाविकास आघाडीकडे. तर इथं अगदी स्पष्ट आहे की मागील चार टर्म ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे निवडून येत असल्यामुळे ही जागा ठाकरे गटाच्या वाट्यालाच जाणार हे तर अगदी क्लियर आहे. मतदार संघात शिवसेनेची पारंपारिक वोट बँक आहे. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ मिळाली तर मतांचे सोशल इंजिनिअरिंग करण ठाकरे गटाला सोपं जाणार आहे. मात्र शेवटी सगळं येऊन अडत ते ठाकरेंचा उमेदवार कोण? या प्रश्नाकडे…कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मतदारसंघातून खासदारकीचे तिकीट मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दानवे मतदारसंघात ऍक्टिव्ह आहेत. विरोधी पक्ष नेते असल्यामुळे त्यांनी आपला जनसंपर्कही वाढता ठेवला आहे. चंद्रकांत खैरे यांचा मावळत्या लोकसभेत पराभव झाल्यामुळे आता दानवेंना संधी देऊन पहावी असही शिवसेनेतील एका गटाचं म्हणणं आहे.

मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं… फक्त निवडणूक नाही, तर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढण्याची माझी शंभर टक्के तयारी आहे. मागच्या १० वर्षांपासून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. माझी लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हे तर तयारी आहे, असं म्हणत दानवेंनी आधीच मैदानात उडी घेतलीय. त्यात अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती म्हणून मागच्या निवडणुकीत माझा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवतील. होईल ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील, असं म्हणून चंद्रकांत खैरेंनिही आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवलीय. त्यामुळे एकाच पक्षातील दोन मातब्बरांनी एकाच मतदारसंघावर दावा ठोकल्याने तिकीट नक्की कुणाला द्यायचं? यामुळे ठाकरेंची डोकेदुखी मात्र कमालीची वाढलीय.

छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांपैकी एका नेत्याला जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यामुळे आता पक्ष काय भूमिका घेतो? यावर बरीच समीकरण अवलंबून असणार आहे. ठाकरेंकडून ज्या नेत्याला तिकीट मिळणार नाही, त्याला शिंदे येथून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या खैरे आणि दानवे यांच्यावर शिंदेंची सेना लक्ष ठेवून आहे. त्यामुळे निवडणूक शिवसेना वर्सेस शिवसेना अशी होईल असं वाटत असताना भाजपच्याही हालचालींकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे.कारण कधी नव्हे ते युतीमध्ये कायम शिवसेनेच्या पाठीशी असणाऱ्या भाजपने यंदा या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना या मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबत
चाचपणी याआधीच करण्यात आली आहे. भाजपकडून अनेक धार्मिक विधींच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येतंय. बागेश्वरधामच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी याला सुरुवात केली यानंतर गंगापूर, वैजापूर, कन्नड भागामध्ये याचं प्रभाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्मांचे लोकं राहतात. लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी 21 ते 22 टक्के एवढी आहे तर अनुसूचित जाती जमातींची संख्या 19 ते 20% त्यामुळे एम आय एम आणि वंचित यांच्या युतीमध्ये इम्तियाज जलील यांना खासदारकीचा मान मिळाला. मात्र आता ही युती राहिलेली नाहीये. त्यात वंचित काय स्टँड घेतेय यावर व्होट शेअर नक्की कुणाच्या पारड्यात पडणार याचा अंदाज येऊ शकतो.
जर का वंचितनं शिवसेनेला पाठिंबा देऊ केला तर ठाकरेंचा हा बालेकिल्ला पुन्हा त्यांना मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात, असंही राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाच्या या टप्प्यात मतदारसंघाचं नाव बदललेलं असताना, श्रीराम मंदिराचा मुद्दा येत्या निवडणुकीत वारंवार बिंबवला जाणार असल्यामुळे एमआयएमला एकट्याला खासदारकीची ही एकाकी लढाई पुन्हा एकदा जिंकता येईल?

भाजपची सर्व सत्ता यंत्रणा पाठीशी असल्यामुळे शिंदे या मतदारसंघात लीड घेत ठाकरेंचं आणखीन खच्चीकरण करू शकतात? की ठाकरेंचा उमेदवार गेले पंचवीस वर्षांपासूनचा आपला पारंपारिक बालेकिल्ला कायम राखण्यात पुन्हा एकदा यश मिळवणार का? तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटतं? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…