हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत शिवप्रतिष्ठान संस्थापक मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे ) यांनी व्यक्त केले. हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लामीकरणाच्या विरोधात झाली आणि छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मनोहर भिडे यांनी नितेश राणे यांच्या सुरात सूर मिसळत शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असं म्हंटल आहे. ते सांगली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ममनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे )म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु धर्माच्या रक्षणासाठीच होते. इतिहासाचा अभ्यास असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले सगळे भाडोत्री आहेत. त्यांच्याकडून हा गलबला निर्माण झाला आहे असा आरोप सुद्धा भिडे यांनी केला. ते पुढे म्हणाले, शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या मताचे होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी शहाजी राजांचा (Shahaji Raje) हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेला. हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, असे भिडे यांनी म्हटले.
रागडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरु असलेल्या वादावर सुद्धा मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे ) यांनी परखड मत मांडत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर पलटवार केलाय. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे ,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे,” असं म्हणत संभाजी भिडे यांनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिले. तसेच स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही असा टोलाही त्यांनी संभाजीराजे छत्रपती याना लगावला.