नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्त्वाच्या विषयांवर मागणी केली आहे. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता कोरोनाची लढाई कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मिळालेल्या बैठकीमध्ये खालील मुद्यांचा समावेश होता
1) ऑक्सिजन
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानानं प्लांट च्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
2) लसीकरण
ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यानं त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशातून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून अधिकाधिक गतीने लसीकरण वाढवू शकतो का? अशी विनंती वजा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. सध्या लसी आयात करण्याचे सर्व अधिकार हे केंद्राकडे आहेत
3) औषधे
राज्यातील औषधांबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की रेमडीसिविर किती उपयुक्त आहे हे सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरवठा पुरेसा व्हावा असे ते म्हणाले. याशिवाय रेमडीसिविर शिवाय अन्य औषधांचाही पुरवठा व्हावा अशी विनंती केंद्र सरकारला केली.
4) डबल म्युटंट विषाणूचा अभ्यास
राज्यात पसरलेल्या विषाणूच्या डबल म्युटंटचा अभ्यास आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात विषाणूचे डबल म्युटंट विषाणू आढळल्यानं संसर्गात ही झपाट्याने वाढ झाली. या संदर्भात पुढील वाटचालीसाठी योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जीनोम सिक्वेन्स करावे जेणेकरून योग्य ते धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.