मुंबई | महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय सातारा जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे आज गुरूवारी दि. 11 रोजी दुपारी 12 वाजता रक्षाबंधन सणादिवशी येत आहेत. त्यामुळे दरे गावी उत्साहाचे वातावरण आहे. गावकऱ्यांकडून त्याच्या स्वागताची तयारी असून आजचा मुख्यमंत्री आपल्या गावच्या घरीच मुक्कामी असणार आहेत.
सातारा जिल्ह्याचे चाैथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मूळगावी येत आहेत. त्यामुळे त्याच्या निवासस्थानी जिल्ह्यातील अनेकजण भेटीसाठी येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री आज दुपारी 12 वाजता मुंबईतून मोटारीने साताऱ्याकडे निघतील ते आपल्या दरे या गावी जातील. सायंकाळी 7 वाजता मुक्कामास गावी जाणार असल्याने त्याचे अनेक ठिकाणी भेटी- गाठी असण्याची शक्यता आहे. उद्या शुक्रवारी दि. 12 आॅगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आपल्या गावातील निवासस्थानी असतील. तदनंतर ते मुंबईकडे रवाना होतील. सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानी जातील.