औरंगाबाद : संभाजीराजे आणि आघाडी सरकारचे चांगले संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांचे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी सरकारवर दबाव आणून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. असे विधान शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
२६ जून रोजी मराठा आरक्षण संघर्ष समितीची पहिला मेळावा औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे. शासनावर आमचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. दीड महिना झाला आरक्षण रद्द होऊन ठाकरे सरकारने एकही पाऊल उचललं नाही, ही सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्या मुळावर आली आहे. याचा संताप मराठा समाजाच्या तरुण पिढीत पाहायला मिळत आहे, त्याच प्रतिबिंब बीडच्या मोर्च्यात पाहायला मिळालं आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्री घाईघाईने दिल्लीला गेले आणि मराठा आरक्षणाबाबत काहीतरी करतोय असं नाटक करण्याचं काम त्यांनी केलं, बाकी काहीही त्यांनी काहीही केलेलं नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.
दरम्यान, त्यांनी महारष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनाची स्थापन करा आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा नक्षलवाद्यांनी टाकलेल्या डावाला प्रतिसाद मिळणार नाही, असं होणार नाही असा इशारा विनायक मेटे यांनी दिला. जे नक्षलवाद्यांना कळलं आहे ते उध्दव ठाकरे यांना कधी कळणार, अशी खोचक टिप्पणीही मेटे यांनी केली.