नाशिक प्रतिनिधी | बिकन शेख,
‘ये लाव रे तो व्हिडोओ’ची धास्ती मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळापत्रक बदलास असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.मोदी आणि शाह सत्तेत नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. यामधून मोदी सरकारच्या योजनांचे ते वाभाडे काढत आहेत. याची धास्ती घेत नाशकातील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
२६ एप्रिल रोजी राज ठाकरेंची नाशिकमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेआधी मुख्यमंत्र्यांच्या सभेत बदल करत त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ एप्रिलला मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.
भाजप सरकार मतदारांची दिशाभूल करत असल्याचे सांगत मोदी आणि शाह यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षाला सोडून कोणालाही मतदान करा, असे आवाहन राज आपल्या प्रत्येक सभेत करत आहे.
भाजपने लोकांना कसे फसवले याचे व्हिडीओ देखील ते आपल्या सभेत दाखवत असल्याने त्यांच्या प्रत्येक सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतं आहे. नाशिकमध्ये २६ एप्रिल रोजी गोल्फ क्लब मैदानावर राज ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेत ते काय बोलतात याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी नाशिक हा राज ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आजही राज यांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. त्यांच्या या सभेमुळे नाशिकमध्ये असलेले शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांना फटका बसू शकतो अशी धास्ती भाजप, सेनेला वाटत आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभेच्या आधी होणारी मुख्यमंत्र्यांची सभा आता दुसऱया दिवशी २७ एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे.