हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी विरोधकांच्या मागणीवरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही हे जरांगे यांना सांगितले होते” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, जरांगेंशी आम्हाला काही देणं घेण नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.
सभागृहामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण देत असताना मनोज जरांगे यांनी कुणबी दाखले देण्याची मागणी केली. त्यामुळे यंत्रणा कामाला लावत कुणबी नोंदी शोधल्या. त्यासाठी 1967 पूर्वीच्या कायद्याचा आधार घेतला. शिंदे समितीचे काम उत्तम आहे, असं स्वतः मनोज जरांगे म्हणाले होते. सरकारने देखील पुर्णपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांनी सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही हे मी त्यांना स्पष्टं सांगितलं होते”
शिंदेंनी जरांगेवर टीका…
त्याचबरोबर, “सरकारने टिकणारे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रमाणे आपण आरक्षण देखील दिलं आहे. सह्याद्रीवर जी बैठक झाली त्यामध्ये एकमताने आरक्षण देण्याचा निर्णय झाला, त्याप्रमाणे आपण केलं. खरे तर, जरांगेंशी आम्हाला काही देणं घेण नाही, पण सरकारने मराठा समाजासाठी जे काम केलं ते स्विकाराचं सोडून मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची सगळी उणीदुणी त्यांनी काढली. पुढे कहर करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला की, त्यांना विष देऊन मारणार आहेत” अशा शब्दात शिंदेंनी जरांगेवर टीका केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याची टीका सध्या सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळेच जरांगे पाटील करत असलेल्या विधानांमागे आणि त्यांच्या आंदोलनामागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी SIT चौकशी होणार आहे. या चौकशीची मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.