हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी कुटुंबाच्या अंधश्रद्धेमुळे एका पाच वर्षाच्या मुलाचा गंगेत बुडून मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एक कुटुंब कॅन्सर आजार झालेल्या आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन हरिद्वारला आले होते. गंगेत आंघोळ केल्यानंतर सर्व आजार दूर होतात, या विश्वासावर त्यांनी हरिद्वारच्या हरकी पायडी येथील घाटावर आपल्या मुलाला गंगेच्या पाण्यात बुडवले. मात्र मुलगा बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे त्याचा दुदैवी मृत्यू झाला. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमके काय घडले?
समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील एक कुटुंब भक्ती भावाने देवदर्शन करण्यासाठी हरिद्वारला आले होते. गंगेत स्नान केल्यानंतर आपण पवित्र होतो, तसेच सर्व आजार दूर होतात अशी श्रद्धा त्यांनी मनाशी बाळगली होती. या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या पाच वर्षीय मुलाला या ठिकाणी आणले होते. महत्वाचे म्हणजे या मुलाला ब्लड कॅन्सर आजार झाला होता. मुलाने देखील गंगेत आंघोळ केल्यानंतर त्याचा हा आजार दूर होईल. असे कुटुंबाला वाटत होते.
यामुळेच कुटुंबातील एका महिलेने पाच वर्षाच्या चिमुकल्याला गंगेच्या पाण्यात बुडवले. बराच वेळ तिने मुलाला पाण्यातून वर काढले नाही. शेवटी घाटावर असलेले आजूबाजूचे लोक तिच्या जवळ आले. आणि त्यांनी जबरदस्तीने मुलाला बाहेर काढले. तोपर्यंत मुलगा बेशुद्ध पडला होता. या लोकांनी मुलाला घाटावर नेले. परंतु याला महिलेने विरोध केला. तसेच लोकांना मारहाण केली. शेवटी लोकांनी या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
गंगेच्या घाटावर घडलेल्या या सर्व घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेते. तसेच पोलिसांकडे या महिलेची तक्रार देखील केली. त्यानंतर त्यांनी या महिलेला ताब्यात घेतले. सध्या पोलीस सर्व घटनेचा तपास करीत आहेत. मात्र, मुलाचा कॅन्सर आजार बरा व्हावा यासाठीच कुटुंबाने मुलाला गंगेत आंघोळ घालण्यासाठी आणले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवरती तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. तसेच महिलेच्या अंधश्रद्धेने मुलाचा जीव घेतला असे देखील म्हटले जात आहे.