दैव बलत्तवर : केंजळगडावरून 10 वर्षाचा मुलगा 200 फूट दरीत कोसळून जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | तालुक्याच्या पश्चिम भागातील केंजळगडावर एक दहा वर्षाचा मुलगा ट्रेकींगसाठी आलेला असताना पाय घसरून 200 फूट दरीत कोसळल्यीच घटना घडली. मयांक गणेश उरणे (वय -10, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या मुलांचे नांव आहे. त्या मुलाला पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला वाई येथील प्राथमिक उपचारानंतर पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, केंजळगडावर ट्रेकींग करण्यासाठी सासवड (ता. पुरंदर) येथील सात ते आठ पर्यटक आले होते. यामध्ये मयांक गणेश उरणे हा आपल्या वडिलांसोबत आला होता. आज सकाळी सात वाजता गडावर पर्वतारोहण करण्यासाठी सुरुवात केली. सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयंक उरणे हा दोनशे फूट खोल खड्यात कोसळून गंभीर जखमी झाला. थंड हवा, पावसाची रिप रिप, वाढलेले गवत यामुळे किल्ल्याच्या पाऊल वाटेवर चिपचिप झाली आहे. यामुळे मयंकचा पाय घसरून तो दोनशे फूट दरीत कोसळून खोल दरीत झाडाला धडकून झुडपात अडकला होता. त्याचा शोध करूनही तो सापडत नसल्याने संबंधित पर्यटकांनी आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्तीवर येऊन ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर वस्तीतील गंगाराम सपकाळ, सागर पाकिरे, सुरेश पाकिरे, रामदास पाकिरे, सचिन पाकिरे, नवनाथ पाकिरे, विलास पाकिरे, विजय पाकिरे आदी तरुण व ग्रामस्थांना सोबत घेऊन सर्व जण मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले. त्या वेळी तो खोल दरीत जखमी अवस्थेत आढळला. त्याला बाहेर काढून त्वरित वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. येथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे.

ही माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर, पोलिस नाईक शिवाजी वायदंडे, सुभाष धुळे, प्रशांत शिंदे, अमित गोळे, संजय देशमुख, संतोष शेलार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाखरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदत कार्य केल्याबद्दल वाई तालुक्यातील नागरिकांनी वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले.