हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील शैक्षणिक वर्षांपासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केल्या होत्या. या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावे लागते. त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक लहान मुले शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील घडतात तसेच त्यांचे अभ्यासात देखील लक्ष लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा असे राज्यपालांनी सुचविले होते.
यानंतर राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सरकारने सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्यामुळे सरकारने तज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे. काही दिवसात मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर, सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलण्यात येईल.
दरम्यान, राज्य सरकारने शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णयाबरोबर आणखीन दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामध्ये बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येईल, हा देखील निर्णय झाला आहे.