भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

२०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत. काही दिवसांपूर्वी पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. त्यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते.

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, ते त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतले. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती दिली नाही किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”