लडाख । गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला, त्या भागातून चीन आणि भारताने आपले सैन्य २ किलोमीटर मागे हटवले आहे. हॉट स्प्रिंगमधील पेट्रोल पॉईंट १५ येथे सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गोग्रामध्ये पेट्रोल पॉईंट १७ जवळ २ किलोमीटरपर्यंत सैन्य माघारीची प्रक्रिया उद्या किंवा परवापर्यंत पूर्ण होईल. पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्रात फिंगर फोरमध्येही चिनी सैन्याच्या हालचाली सुरु आहेत. तिथून सैन्य वाहने आणि तंबू चीनने हटवला आहे. पण अजूनही तिथे चिनी सैनिक आहेत. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
काल गलवान नदी खोऱ्याच्या भागातील पेट्रोलिंग पॉईंट १४ वरुन चिनी सैन्याची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. याच ठिकाणी १५ जून रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० सैनिक ठार झाले होते. मात्र रिज लाइनवर अजूनही चीनी सैन्य उपस्थित आहे. या पूर्वी फिंगर ४ च्या पुढे भारतीय सैनिक पेट्रोलिंग करत असत. मात्र फिंगर ४ परिसरात चीनी सैनिकांच्या उपस्थितीनंतर भारतीय सैनिक या भागात पेट्रोलिंग करू शकत नाहीत.
उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांवरुन गलवान नदी खोऱ्यातून चिनी सैन्याने आपले बांधकाम हटवून ते माघारी फिरल्याचे स्पष्ट झाले आहे. गलवान खोरे, हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि फिंगर फोर या चार भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने आले होते. ३० जून या दिवशी भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये गलवान खोरे, हॉट स्प्रिंग, पँगाँग त्सो आणि गोगरा येथील तणाव कमी करण्यासाठी एका सूत्रावर सहमती झाली होती. लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये टप्याटप्याने पण वेगात सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरले होते. त्यानुसार आता घडताना दिसत आहे. एप्रिलच्या मध्यामध्ये जी स्थिती होती, तशीच ‘जैसे थे’ स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”