नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखमधील भारत-चीन सीमेवर स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भारतातील सर्व चायनीज हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी चायनीज पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालायला हवी. चायनीज हॉटेल्स बंद करायला हवीत, अशी अशी ठाम मागणी केली आहे. चायनीज हॉटेल्स व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहा, असे आवाहनही आठवले यांनी देशवासियांना केलं आहे.
चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर
भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवायला सक्षम आहे, असे आठवले यांनी नमूद केले. भारतात करोनाशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू, असे आठवले पुढे म्हणाले.
१९६२ची गोष्ट वेगळी आणि आताची स्थिती वेगळी
पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना भारताची चीनशी चांगली मैत्री होती. मात्र त्याचवेळी १९६२ मध्ये चीनने भारताशी दगाबाजी केली. आताही त्याच लडाख सीमेवर चीन चालबाजी करत आहे. एकीकडे चर्चा करण्याचे नाटक करून सीमेवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत. चीनने दगाबाजी करून जो हल्ला केला त्याला आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आपण त्यांचे ४३ सैनिक मारलेत. तेव्हा १९६२ची गोष्ट वेगळी आणि आताची स्थिती वेगळी हे चीनने ध्यानात ठेवावे. भारत आता कोणतेही आव्हान परतवून लावण्यास सक्षम आहे, असे आठवले यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”