सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली शहरातील शेरीनाल्याची गटारगंगा कृष्णा नदी पात्रात आजही सोडली जात असल्याने सांगली व कुपवाडकरांना पाणी नव्हे तर विष पचवावे लागत आहे. शेरीनाला शुध्दीकरणासाठी ३४ कोटींची धुळगाव शेरीनाला योजना राबवली. शुध्द पाण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र व वितरण व्यवस्थेवर कोट्यावधी रूपये खर्च केले. मात्र सांगली व कुपवाडकरांना दूषितच पाणीपुरवठा होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी महापालिकेला कोटीचा दंड करते. मात्र महापालिकेला अद्याप जाग आलेली नाही. आता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील यांनी महापालिकेवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता तरी मनपाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. शेरीनाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्व.मदनभाऊ पाटील यांनी पुढाकार घेतला. धुळगाव शेरीनाला योजना केंद्राकडून मंजूर करून घेतली. सांगलीतून शेरीनाल्याचे पाणी उचलून धुळगाव येथे जलशुध्दीकरण करून शेतीला देण्यात येते. त्यासाठी कुपवाड येथे पंपिंग स्टेशन उभा केले आहे.
पूर्वीची तेरा कोटींची योजना ३४ कोटींवर गेली. या योजनेवर ३४ कोटी रूपये खर्च झाले. मात्र या शेरीनाल्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. धुळगाव येथे वितरण व्यवस्थेची गरज आहे. त्यासाठी ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी आठ कोटींचा निधी आवश्यक आहे. मात्र हा निधी तत्कालिन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात महापालिकेला मिळालेला नाही. सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सत्ता येऊन नऊ महिने झाले आहेत. केंद्र व राज्यात देखील भाजपची सत्ता आहे. मात्र या निधीसाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे दिसून येत नाही.