कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील शनिवार पेठ मुळीक चौक परिसरातील घर नं. 184 ड या इमारतीवर नव्याने सुरू असलेल्या मोबाईल टॉवरचे काम त्वरीत थांबवण्यात यावे. तसेच याच परिसरातील घर नंबर 189 या इमारतीवर गेल्या पंधरा वर्षांपासून उभा असलेला मोबाईलचा टॉवर हटवण्यात यावा, अशी मागणी मुळीक चौक परिसरातील नागरीकांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके व उपविभागीय तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, शनिवार पेठ मुळीक चौक येथील घर नंबर 184 ड या इमारतीवर नव्याने मोबाईलच्या टॉवरचे काम सुरू आहे. अगोदरच मुळीक गल्ली येथील घर नंबर 189 या ठिकाणच्या तीन मजली इमारतीवर गेल्या 15 वर्षांपासून मोबाईलचा टॉवर उभा आहे. या टॉवरमधून रेडिएशन (क्ष-किरणे) मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकले जात आहेत. या रेडिएशनमुळे परिसरातील नागरिकांना घातक आणि दुर्धर आजारांना सामोरे जावे लागत आहे. वैज्ञानिकांनीही या रेडिएशनमुळे कॅन्सरसह इतर दुर्धर आजार होत असल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.
मुळातच मोबाईलचे टॉवर हे कमर्शियल एरियामध्ये असावेत ते रहिवासी क्षेत्रामध्ये नसावेत असे निकष आहेत. तरीही दाट लोकवस्ती असलेल्या शनिवार पेठ मुळीक गल्ली येथील घर नंबर 189 च्या इमारतीवर गेल्या 15 वर्षांपासून मोबाईल टॉवरचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसवले आहे. या टॉवरमधून बाहेर पडणार्या घातक रेडिएशनमुळे परिसरातील शंभर मीटर अंतरावरील नागरिकांना अनेक व्याधी जडलेल्या आहेत. असे असतानाही या परिसरात शंभर फुटाच्या अंतरावर आणखी दुसरा मोबाईलचा टॉवर बसवून या परिसरातील लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांच्या जीविताशी व आरोग्याशी खेळ सुरू आहे का? कडक लॉकडाऊन असूनही इतक्या जलदगतीने टॉवरचे काम का सुरू केले आहे? यामागचे नेमके गौडबंगाल काय? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
मुळीक चौकात नव्याने सुरू असलेल्या या मोबाईल टॉवरचे काम प्रशासनाने तात्काळ बंद करावे आणि मुळीक गल्लीतील घर नंबर 189 च्या इमारतीवरील जुना मोबाईलचा टॉवर तात्काळ काढून टाकावा. अन्यथा या परिसरातील नागरिकांच्या तीव्र भावनांचा उद्रेक होईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर परिसरातील 75 नागरीकांच्या सह्या आहेत.