हिंगोली | वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावासह व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावातून रविवारी सकाळी 7.15 व त्यानंतर 08:19 या वेळेत दोनदा आवाज आले आहेत. या आवाजामुळे पूर्ण जमीन हादरून सौम्य धक्का जाणवला आहे. वसमत तालुक्यातील अनेक वर्षापासून जमिनीतून गुढ आवाज येत आहे. काही वर्षापूर्वी हे आवाज वर्ष, दोन वर्षानंतर येत होते. त्यानंतर हे आवाज आता सहा महिन्यावर आले आहेत. मात्र आता मागच्या दोन वर्षात आठ पंधरा दिवसाला असे आवाज येत आहेत.
औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावात आवाज येण्याचे सत्र सुरू झाले आहेत. रविवारी सकाळी 7. 15 वाजता पहिला आवाज आला. त्यानंतर 08:19 ला दुसरा आवाज आला. या आवाजाची तीव्रता अधिक असल्याची माहिती मिळाली आहे. हे आवाज पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खापरखेडा, खांबाळा, तर औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसर तर कळमनुरी तालुक्यातील आसोला, पोतरा, बोल्डा, सोडेगाव, म्हैसगव्हान, हारवाडी आदी गावात आले आहेत.
या आवाजाने कोणालाही कोणतीही हानी झालेली नाही. मात्र गावकरी अत्यंत भयभीत झाले आहेत. या आवाजाचे गुढ अद्याप समजलेले नाहीये. दरम्यान, या आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.