सांगली | जत शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाणे व आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. एकूण ३० नागरिकापैकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला. अँटीजन चाचणी होईल या भीतीने यावेळी काही नागरिकांनी धूम ठोकली.
जत शहरात कोरणाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी जत नगरपरिषदेने 10 दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला. पोलिसांनी आवाहन करूनही नागरिकांची सकाळी मोठ्या प्रमाणात फिरायला गर्दी सुरुच होती. कोरोनाची रुग्ण संख्येत घट व्हावी यासाठी शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व जतचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाल भोसले, नगरसेवक एडके यांच्या संकल्पनेतून शहरात सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय झाला.
यावेळी एकूण ३० नागरिकापैकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला. या कारवाईत पोलीस नाईक सचिन जवंजाळ, अमोल चव्हाण, चालक राजेद्रं पवार, आरोग्य विभागाचे विश्वास लवटे, गोपाल कोळी आदींनी सहभाग घेतला. पोलीस, आरोग्य विभाग यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.