औरंगाबाद | भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून शहरावासियांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार असल्याने शहराची विकासाकडे अधिक जोमाने वाटचाल होणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सुपर हिरो पार्क, प्लास्टीक बॉटल रिसायकल बिन, एफआरपी पोर्टेबल टॉयलेट, सिध्दार्थ जलतरण तलावाचे नुतनीकरण इत्यादी कामांचा लोकार्पण सोहळा देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सर्वश्री आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, वस्तु व सेवा कर (जीएसटी) चे सहआयुक्त जी.श्रीकांत, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, महानगर पालिकेचे सहायक आयुक्त बी.जी.नेमाने आदींची उपस्थिती होती.
शासन, जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. त्यामुळे कोरानाची निर्बंध कमी करण्यात येत आहे. याची पूर्वतयारी म्हणून आज महानगर पालिकेच्या जलतरण तलावाचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच स्त्री व पुरूषांकरीता शहराच्या विविध 100 ठिकाणी पोर्टेबल स्वच्छतागृहे, बच्चे कंपनीकरिता सुपर हिरो उद्यान, आदींसह विविध दर्जेदार नागरी सुविधा शहरवासियांना मिळत असून हे नक्कीच अभिमानास्पद असल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले की, शहराची ह्दयस्पर्शी योजना म्हणजे 1680 कोटी रुपयांची पाणी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शहरात उभारण्यात येत असलेल्या मनोरा टाक्या, 250 कोटींची रस्त्यांची कामे, घनकचरा योजना, गुंठेवारीचा प्रश्न आदी समाजभिमुख योजनांमुळे नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होत आहे ही समाधानाची बाबत आहे. या सर्व समाजभिमुख योजनांची कामे दर्जेदार होण्याकरिता शासन दक्ष आहे. शहरातील गुंठेवारीचा प्रश्न येत्या ऑक्टोंबर पर्यंत संपविण्याकरीता या योजनेस नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहनही श्री.देसाई यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला महानगर पालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरात सुरू असलेल्या धुळमुक्त औरंगाबाद, स्मार्ट सिटी बसकरीता डेपो, मनपाचा आकृतीबंध, पेन्शन योजना, 178 कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सातारा-देवळाई परिसरातील ड्रेनेज लाईन टाकणे, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, ई-गव्हर्नस, आदी शहरात सुरू असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुरूवातीला माझी वसुंधरा हरित शपथ नागरिकांना देण्यात आली.