हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आघामी निवडणुकीच्या दृष्टीने घडामोडी घडू लागलेल्या आहेत. अनेक राज्यांच्या राजकीय विश्लेषकांकडून आगामी काळात विरोधी पक्षांनी राज्यात कोणाशी आघाडी करायची? केल्यास कोण मुख्यमंत्री होतील, असे दावे केले जात आहेत. यातच आता उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
देशातील काही राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून पक्षसंघटना बळकटीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातील एक उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान आज काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात नवा दावा केला आहे.
यावेळी राजेश तिवारी यांनी सांगितले की, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकाऱ्यांनाही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.