BREAKING : हनुमान जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक; पोलिसांसह अनेकजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर दगडफेक झाली असल्याची माहिती आहे. राजधानी दिल्ली येथील जहांगीरपूरी भागात सदर घटना घडली आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून काही नागरिकांना दुखापत झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीवेळी दोन्ही गटांमध्ये काही कारणांवरून बाचाबाची झाली. यावेळी जोरदार दगडफेकही करण्यात आली. या घटनेत पोलिसांसह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या गोंधळात अनेक वाहनांची तोडफोडही झाली आहे. जखमींना जहांगीरपुरी येथील बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन करून आरोपींचा शोध घेत आहेत.

यासोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. हा पूर्वनियोजित कट आहे का? अचानक अशी घटना घडली असेल तर त्यामागची कारणे काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.

गृहमंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेतला असून गृहमंत्री अमित शहा यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे. तसेच, मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.

भाजप नेते मनोज तिवारी यांनी सांगितले की, जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त दगडफेकीची घटना घडली. राजधानीत हा सर्व प्रकार मोठ्या षडयंत्राखाली होत आहे. तत्काळ चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. या घटनेबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच अहवाल मागवला.

Leave a Comment