औरंगाबाद प्रतिनिधी । बदलीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून इच्छित ठिकाणी बदली करुन देण्यासाठी सहकर्मचाऱ्याकडून २५ हजार रुपये लाच घेताना मृदा व जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणात तक्रारदाराने बदली करण्यासाठी मुख्यालयात अर्ज सादर केला होता. हा अर्ज वरिष्ठ लिपिक सतीश मुळे यांच्याकडे होता. हा अर्ज वरिष्ठांना पुटअप करून काम पूर्ण करून देण्यासाठी मुळे यांनी तक्रारदाराला १२ फेब्रुवारी रोजी पंचवीस हजाराची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दाखल केली होती.
मंगळवारी लाचेची रक्कम घेऊन मुळे यांनी तक्रारदाराला बोलावले होते. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने मुळे याला लाच घेताना अटक केली. पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधिक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक सुजय घाटगे, भिमराज जिवडे, संतोष जोशी आणि कपिल गाडेकर यांनी ही कारवाई केली.