औरंगाबाद – मोजणी केलेल्या जमीनीचा हद्द कायम नकाशा देण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना गंगापूरच्या भूमी अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले आहे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. करमचंद कचरू कोलते (39) असे आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या मामाच्या जमिनीची मोजनी 11 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. मोजणी केलेल्या जमीनीची हद्दकायम म्हणजे मोजणी नकाशा प्रत देण्यासाठी भूमी अभीलेख कार्यालयातील लिपिक करमचंद कचरू कोलते यांनी तक्रारदार यांच्याकडे 7 हजार लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुपत विभागाकडे तक्रार केली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून 7 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणात सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांनी भूमीका पार पाडली. मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, तर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जोशी, पोलीस नामदार भुषण देसाई, पोलीस अंमलदार केवलसिंग गुशिंगे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांचा सापळा पथकात समावेश होता.