कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण – शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, खरिपातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांनी हात वर केले. अतिवृष्टीचे अनुदान खात्यात जमा झालेले नाही, सरकारने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले पन्नास हजाराचे अनुदान बँकेने जमा केले नाही, अशा प्रकारे नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. सर्व बाजूने शेतकऱ्यांचे येणे बाकी असताना वीज बिलाच्या देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करेल असा इशारा दिला.

महावितरण वीजचोरी, गळतीची तूट शेतकऱ्यांच्या वीजबीलातून वसूल करते असा आरोप शेट्टी यांनी येवली केला. तसेच महावितरणने शेतकऱ्यांना आकारलेले कृषी पंपाचे बील चुकीचे व अवास्तव असल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे वसुल करण्या आधी महावितरणने बीलांची दुरूस्ती करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. ऊसाचा भाव घोषित करा म्हणून कारखान्यावर गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने दडपशाही केली, याचा निषेध करत या बाबत चौकशी करण्यात येईल असेही शेट्टी यांनी सांगितले. लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल. तेव्हा कोण दडपशाही करतो ते बघू असे आव्हानही शेट्टी यांनी दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे, बद्रीनाथ बोंबले, साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like