मुंबई प्रतिनिधी। ‘दोन्ही पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना युतीत कोणतंही स्थान राहणार नाही. त्यांना त्याची जागा दाखवून दिली जाईल’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली त्यावेळी ते बोलत होते.
भाजपमधील एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘तिकीटं कापली म्हणणं योग्य नाही, जबाबदारी बदलली आहे’. तसेच पुढच्या दोन दिवसात बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु पण तरीही कोणी बंडखोरीवर ठाम असेल तर महायुती पूर्ण ताकदीने त्यांच्याविरोधात लढेल असे फडणवीस म्हणाले.
महायुतीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले की,’विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजय होईल. कुणी अतिशयोक्ती म्हणेल पण महाराष्ट्रात कधीच कुणाला प्रतिसाद मिळाला नाही इतका प्रतिसाद या निवडणुकीत महायुतीला मिळेल’. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत ते मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील, असे नमूद केले.