कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे. राज्यतील सर्व उद्योग बंद आहेत. हातावर पॉट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. अशा बिकट परिस्थितीत सापडल्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी अनेक आर्थिक मदतीचे हात समोर येत आहेत. असाच एक मदतीचा हात कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त करवीर तालुक्यातील चिखली गावाने पुढे केला आहे.
महापुराचे दुःख बाजूला सारत त्यावेळी केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील चिखली गावाने पुढाकार घेतलाय. कोरोनाच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रूपये देण्यात येणार आहेत. महापुराने उध्वस्त झालेल्या प्रयाग चिखलीच्या नागरिकांना उभ्या महाराष्ट्राने मदत केली होती. याच चिखलीकरांनी आता कोरोनामुळे महाराष्ट्र अडचणीत असताना पुढे येत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखाची रक्कम देण्याचा निर्धार केला आहे. भयावह अशा महापुराने अद्याप हे गाव सावरले नाही, अनेकांची दुभती जनावरे वाहून गेलीत, हजारो एकर शेती उध्वस्त झाली, अनेकांची घरे नष्ट झाली मात्र हे दुःख बाजूला सारत महाराष्ट्रने केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी हे गाव आता पुढे आलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”