हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे आज मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे टोले लगावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, पण काही लोक म्हणतील मीच बांधला. असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. आजचा क्षण हा आदळ आपट नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. पर्यटनावर तळमळीने आणि मळमळीनं बोलणं वेगळं आहे. ज्योतिरादित्य शिंदे अधिक तळमळीनं बोलत होते. पाठांतर करून आणि आत्मसात करून बोलणं वेगळं आहे. शिवसेना आणि कोकणाचं नातं सांगायला नको,” असं यावेळी मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आज इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही, असे नारायण राणेंनी म्हटले होते त्यालाही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.