हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 8 ऑक्टोबर ला एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय जुगलबंदी रंगणार का ?? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
येत्या ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे व राणे हे एकाच व्यासपीठावर दिसतील. त्यामुळं या कार्यक्रमाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं बांधकाम 2014 साली झालं होतं. पण डीजीसीए आणि ‘एअरपोर्ट ऑथोरिटीकडून’ काही दुरूस्त्या सुचवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून काही परवानग्या बाकी होत्या. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानतळावर ‘ट्रायल’ घेण्यात आली. आता हे विमानतळ वाहतूकीसाठी पूर्णपणे तयार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय. विमानतळाच्या उभारणीवरून शिवसेना व भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. आपल्याच प्रयत्नामुळं हे विमानतळ सुरू होतंय असा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे.