मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूडमधील कलाकारांवर बेजजबादार प्रसार माध्यम आणि राजकीय नेत्यांकडून आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेत त्यांना पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. बॉलिवूडवरील हल्ल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
“मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलिवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हे एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते. तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
कोरोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून, याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”