हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एवढंच नव्हे तर मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता असे म्हणत पुन्हा एकदा आपल्या विधानाने खळबळ उडवून दिली.