हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात रुग्णालय प्रशासन कोणतेही मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालय देणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, रुग्णालयात दाखल होत असताना उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलंय. या निवेदनात त्यांनी म्हटलं होत की, दोन वर्षांपासून आपण कोव्हिडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय.
कामादरम्यान, मान वर करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. आपण आजच हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.