विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा: मुख्यमंत्री ठाकरे कुलगुरु यांच्यात महत्वाची बैठक

मुंबई । राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शनिवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.एकूण परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना श्रेणी देऊन पदवी प्रदान करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) केली होती. UGCला असे पत्र लिहिल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्याची दखल घेऊन उच्च शिक्षणमंत्र्यांनी अशा बाबतीत ढवळाढवळ करू नये. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, असे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. आधीच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात हा मुद्दाही तापला होता.

सरकारने आधी विद्यापीठातील अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर युवा सेनेने अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून त्याऐवजी श्रेणी देऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याची परवानगी मागितली होती. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याला आक्षेप घेतला आणि परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यानंतर राज्यपालांना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याची आणि सरकारला अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा घेण्याबाबत कळवले होते. त्यावेळी त्यांनी उच्च शिक्षणमंत्र्यांच्या परीक्षा न घेण्याच्या मागणीवरही रोष व्यक्त केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”