कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. यावेळी अंबाबाईची विधीवत ओटी भरून त्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालच उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर काल रात्री कोल्हापूरात पोहचत एका हॉटेलमध्ये मुक्काम देखील केला. दरम्यान आज सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांना अंबाबाईची मूर्ती ती भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना बेळगाव संदर्भातील घटनेसंदर्भात विचारलं असता त्यांनी हात जोडत कोणतंही भाष्य करणं टाळलं. अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरहून थेट पुण्याकडे विमानाने प्रयाण केलं.