हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी भागात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मी इथं कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सिंधुदुर्गसाठी रवाना झाले आहेत. तिथे ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.