अलिबागच्या समुद्रात वसलेला आहे रहस्यमय किल्ला; यंदाच्या उन्हाळ्यात आवश्य द्या भेट

0
1
kulaba fort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राच्या (Maharashtra) इतिहासाला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. या किल्ल्यांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. आज आपण अशाच एका रंजक किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. हा किल्ला जलदुर्ग तर कधी भूईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो. अलिबागच्या समुद्रात वसलेला कुलाबा किल्ला (Kulaba Fort) छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chattrapati Shivaji Maharaj) सागरी संरक्षण बळकट करण्यासाठी बांधला होता. हा किल्ला जलदुर्ग आणि भूईकोट अशा दोन्ही प्रकारांत मोडतो. कारण, भरतीच्या वेळी तो चारही बाजूंनी समुद्राने वेढला जातो, तर ओहोटीच्या वेळी किनाऱ्याशी जोडला जातो.

इतिहास आणि बांधणी

कुलाबा किल्ल्याचे बांधकाम १६८०च्या सुमारास पूर्ण झाले होते. त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत हा किल्ला आरमारी हालचालींचा केंद्रबिंदू बनला. हा किल्ला २६७ मीटर लांब आणि १०९ मीटर रुंद अशा मोठ्या खडकावर उभारलेला आहे. किल्ल्याच्या रचनेत शिवकालीन स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. हा किल्ला मोठेमोठे दगड रचून बांधण्यात आला आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटा तटावर आदळल्यावर त्यांचा जोर कमी होतो आणि किल्ल्याच्या संरक्षणावर परिणाम होत नाही.

वैशिष्ट्ये आणि शिल्पकला

या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर हत्ती, मोर, हरण आणि कमळ यांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. किल्ल्याच्या आतील भागात भवानी माता, पद्मावती देवी आणि गुलवती देवीची मंदिरे आहेत. तसेच वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष आजही या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात.

किल्ल्यात जाण्याचा मार्ग

या किल्ल्यावर आपल्याला मुंबईहून पनवेल- वडखळ मार्गे अलिबागला जाता येते. तसेच मुंबईहून बोटीद्वारे मांडव्याला जाऊन, तेथून अलिबागपर्यंत एसटी बस किंवा रिक्षाने जाता येते. ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावरून चालत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते, तर भरतीच्या वेळी बोटीने जाण्याची सोय असते.