औरंगाबाद – उत्तर आणि वायव्य भारतासह मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र होत असून थंडी चांगलीच झोंबू लागली आहे. ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून उबदार कपड्यातच लोक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच स्वेट, मफलर, कानटोपी, जाकेट, ब्लॅंकेट अशा उबदार कपडे खरेदीसाठी लोक गर्दी करू लागले असून विक्रेत्यांचा धंदाही हिवाळ्यात गरमागरम असल्याचे चित्र आहे.
दरम्यान सोमवारी मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहराचे किमान तापमान 10.6 अंशांवर घसरल्याचे चिकलठाणा वेधशाळेकडून कळविण्यात आले. तसेच परभणी शहराचे तापमान 7.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेल्याने मराठवाड्यात खर्या अर्थात थंडीची सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादेतही गारठा वाढला असून मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमान दहा ते अकरा अंशांवर आले आहे. सोमवारी हुडहुडी आणखीनच वाढली असून पुढेही काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हिमालयात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे. वायव्येकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या हवामानामुळे थंडीची लाट तीव्र होत असून, त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात थंड दिवस अनुभवायला मिळत आहे. आज देखील किमान तापमानात आणखी घट होणार असल्याचे हवामानतज्ञांनी सांगितले आहे.