सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कर्मचारी-अधिकारी यांनी निवडणूक कामाच्या वेळेशिवाय इतर वेळी कार्यालयीन कामकाजावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करायचेच असुन लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे अशी माहीती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्देशक आशिष सक्सेना सांगलीत दाखल झाले असून त्यांनी सर्व निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला.
सध्या निवडणूक कामाच्या निमित्ताने अनेक शासकीय कार्यालयात सामान्य लोकांची नियमीत कामेही अडकून पडत आहेत, अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयासारखी जनतेला नियमीत गरजेची असणारी कार्यालये बंद ठेवली जात आहेत याबाबत डॉ. चौधरी यांनी ही माहीती दिली. लोकांची कामे थांबू नयेत याची दक्षता घेण्याचे आवाहन केेले. उमेदवार अर्ज भरण्यास येताना १० पेक्षा अधिक वाहने ताफ्यात असू नयेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मिटर परिसरात येताना उमेदवारासोबत ५ पेक्षा अधिक माणसं असू नयेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
आतापर्यंत आचार संहिता भंगच्या २३ तक्रारी दाखल झाल्या असून या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. सांगली लोकसभा निवडणूक निर्देशक म्हणून आशिष सक्सेना दाखल झाले आहेत. त्यांनी निवडणूकीच्या संपूर्ण कामकाजाची माहीती घेतली. शासनाने निवडणुकीच्या संदर्भात तक्रारीसाठी १९५० हा क्रमांक दिला असून त्याशिवायही 02332600363 नंबरवरही तक्रार देण्यात येणार आहे.