सांगली : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या अनुषंगाने समाज कंटकांच्या माध्यमातून दोन समाजात, गटांत तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सांगली जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सांगलीत जमावबंदी आदेश लागू केल्याने शिवप्रतिष्ठानाने आज शिवतीर्थावर आयोजित केलेली निषेध सभा स्थगित केल्याची माहिती दिली. ही सभा संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हाेणार हाेती. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने सभा स्थगित करीत आहाेत अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थीकलश सांगलीत दाखल झाला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत अस्थीना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्रिपुरा येथील जातीय दंगलीचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यासाठी मंगळवारपासून पाच दिवस जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये ही कार्यवाही केली जाणार असून त्याआधी सांगली शहरात पोलिसांनी संचलन करून इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, की त्रपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झाला आहे. यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेवून काही समाज कंटक दोन समाजामध्ये, गटांमध्ये तेड निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी 6 पासून २० नोव्हेंबर मध्यरात्री 12 पर्यंत पाच व पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. दरम्यान, दंगलीच्या प्रकारांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानतर्फे आज निदर्शने होणार होती. त्याला परवागनी नाकारण्यात आली. त्याच ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था या ठिकाणीच करण्यात आली आहे. पोलिसांनी या ठिकाणीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे.