जिल्हाधिका-यांनी खासदारांवर कठोर कारवाई करावी : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरातील लाॅकडाऊन प्रशासनाकडून तुर्तास मागे घेण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

खासदार इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी शहरात लाॅकडाऊन रद्द झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करीत जो जल्लोष साजरा केला, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशी जोरदार टीका खैरे यांनी केली.

एकीकडे आम्ही व तमाम हिंदूबांधव नियमांचे कठोर पालन करीत असताना, जलील यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात विनामास्क जल्लोष साजरा केला. सोशल डिस्टन्सिगचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिका-यांनी काय कारवाई केली, याचे उत्तर द्यावे. एकीकडे कोरोनाचे उल्लंघन केले म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे आणि दंडात्मक कारवाई होते. मग त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. जलील यांनी कायद्याचे पूर्णतः उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी संतप्त खैरे यांनी केली आहे.

You might also like