कराड | कराडच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे. कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा असून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, स्मारक कराडमध्ये व्हावा, अशी कराडवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून आपल्या मार्गदर्शन व अनमोल सहकार्याने कराडमध्ये जुन्या भेदा चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी कराड येथील नियोजित स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिलेली आहे.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्यानुसार गेली दोन वर्षे स्मारक समिती पाठपुरावा करत होती. स्मारकासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर नगरपालिकेने 16 फेब्रुवारी 2022 ठराव करून जुन्या भेदा चौकातील जागा देण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर गेले सात महिने विविध शासकीय विभागाच्या परवानग्या मिळवल्या असून गेले सात महिने यासाठी अथक पाठपुरावा सुरू होता. समितीने केलेल्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी कराड येथील नियोजित स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिलेली आहे. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष जयंत पाटील, सचिव रणजित पाटील, सदस्य एॅड. दीपक थोरात, प्रतापराव साळुंखे, प्रताप इंगवले, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, भूषण जगताप यांच्यासह समितीचे सर्व सदस्य पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
याबाबतचे पत्र स्मारक समितीला देण्यात आले आहे. सदरचे कार्य सर्व शिव- शंभू प्रेमींच्या सहकार्याने पूर्णत्वास येत आहे. स्मारकास मंजुरी मिळाली असून आता प्रत्यक्ष स्मारक उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. हे स्मारक महाराष्ट्रातील भव्य स्मारक होणार आहे. राज्यात या स्मारकाची दखल घेतली जाणार असून कराड शहराच्या वैभवात भर टाकणारे हे स्मारक ठरणार आहे. सदरचे स्मारक 55 फुटांचे असून यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा, संग्रहालय, स्पर्धा परीक्षार्थींसाठी अभ्यासिका, ग्रंथालय असणार आहे. सुमारे 7 कोटींचा हा प्रकल्प असून तीन टप्प्यात या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे.