सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात उद्या शनिवार 3 जुलै पासून अत्यावश्यक नसलेली सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर अत्यावश्यक असलेली सेवा/ आस्थापना केवळ 5 तासांसाठी सुरू राहणार असून वीकेंड लाँकडाऊन राहणार असल्याचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला आहे.
जिल्हाधिकारी यांनी आज दिलेल्या आदेशात हॉटेल्स, रेस्टॉरंट ग्राहकांना बसण्यासाठी बंद राहणार आहेत. केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. ज्या शासकीय व खाजगी कार्यालयांना मुभा दिली आहे, ती केवळ 25% क्षमतेने चालू राहतील.
केश कर्तनालय, सौंदर्य केंद्रे दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु ज्यांनी लस घेतली आहे अशांना प्रवेश दिला जावा. व्यायाम शाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील.
शेतीविषयक आवश्यक असणारी बियाणे, खते, उपकरणे यांची देखभाल व दुरूस्ती दुकाने आठवड्यातील सर्व दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील तर मशागत सेवा 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.
शनिवार आणि रविवार सातारा जिल्ह्यात संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे वैद्य कारणाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आदेशात म्हटले आहे.