सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना या वाढत आहेत. काल अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सायंकाळी विश्रामबाग परिसरातून अटक केली. त्याच्याकडून फ्रिज, खुर्ची, वॉटर कुलर आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. सागर लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने संजयनगर येथे घरफोडी आणि मिरजेतून सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
काल सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विश्रामबाग परिसरात शोध मोहीम राबवत असताना पोलीस नाईक बिरोबा नरळे यांना खास बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि एक इसम संशयित रित्या मंगळवार बाजार परिसरात फिरत आहे. त्यानुसार पथक तातडीने परिसरात दाखल झाले असता सागर लोखंडे हा या परिसरात फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य दोघा साथीदारांसह पाच महिन्यापूर्वी वसंतदादा साखर कारखान्यासमोरील आरोग्य केंद्राचे कुलूप तोडून येथील फ्रिज, खुर्ची आणि वॉटर कुलर या वस्तूंची चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच त्याच्या जवळ असणाऱ्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता ती त्याने मिरज येथून चोरून आणल्याचे कबुल केले. त्याच्याकडून फ्रिज, खुर्ची, वॉटर कुलर आणि एक मोटारसायकल असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला घरफोडीच्या गुन्ह्यातील तपासासाठी संजयनगर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, विजय पुजारी, निलेश कदम, सुधीर गोरे, बिरोबा नरळे, संदीप पाटील, अनिल कोळेकर यांनी केली.