दिलासादायक ! तब्बल १५६ दिवसांनी जिल्ह्याचा कोरोना मृत्यूवर विजय

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेली रुग्ण मृत्यूची मालिका तब्बल १५६ दिवसांनंतर काल गुरुवारी थांबली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ २८ रुग्णांची वाढ झाली असून आजघडीला जिल्ह्यात सध्या ३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिन्यांनंतर म्हणजे १८० दिवसांनंतर मृत्यूचक्र थांबले होते. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत अधूनमधून अनेक दिवशी कोरोनाबळी टळले. जिल्ह्यात २३ फेब्रुवारी रोजीही एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, दुर्दैवाने त्यानंतरचा प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. दुसऱ्या लाटेत कोरोना मृत्यूचे तांडव पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचे प्रमाण कमी झाले. त्यातही शहराने अनेकदा मृत्यूवर मात केली. मात्र, ग्रामीण भागात रोज मृत्यू सुरूच होते. मात्र, जिल्ह्याने गुरुवारी कोरोना मृत्यूवर विजय मिळविला.

जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ३४४ झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४३ हजार ५५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत दुर्दैवाने ३ हजार ४९० रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील सात आणि ग्रामीण भागातील ३०, अशा ३७ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकही मृत्यू नसणे ही बाब समाधानकारक असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या तुलनेत औरंगाबादेत कमी रुग्ण आणि शून्य मृत्यू हे दिलासादायक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले.