घरबसल्या मोबाईलवरच करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण; कसे? जाणून घ्या

0
9
e-KYC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण नेट कॅफेच्या बाहेर या प्रक्रियेसाठी तासान तास उभे राहिलेले पहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ (Mera E-KYC) हे ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या ई-केवायसी (E-KYC)प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे ॲप वापरून नागरिक केवायसी प्रक्रिया काही मिनिटांतच पूर्ण करू शकतात.

‘मेरा ई-केवायसी’ ॲपची वैशिष्ट्ये

१) लाभार्थी घरी बसून सहज आणि वेगवान पद्धतीने ई-केवायसी करू शकतात.
२) फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे त्वरित ओळख पडताळणी केली जाते.
३) लाभार्थी स्वतः ई-केवायसी करू शकतात किंवा रास्त भाव दुकानदार अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीदेखील ही प्रक्रिया पार पाडू शकतो.
४) आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना दोन ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावी लागतील – ‘Mera E-KYC Mobile App’ आणि ‘Aadhaar Face RD Service App’. हे ॲप्स इन्स्टॉल करून आवश्यक परवानग्या दिल्यानंतर, लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य निवडून आधार क्रमांक व ओटीपी टाकावा. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन प्रक्रियेअंतर्गत चेहऱ्याची पडताळणी करावी लागेल.

लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

ई-केवायसी प्रक्रिया ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

परंतु, २८ फेब्रुवारी २०२५ पूर्वी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी.

महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांनी IMPDS KYC प्रणालीचा वापर करावा.

दरम्यान, या नव्या डिजिटल सुविधेमुळे राज्यातील सामान्य आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतील. या ॲपमुळे त्यांना सगळ्यात दुकानात जावे लागणार नाही. तसेच, गरजू नागरिकांना अनुदानित धान्य मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल. परंतु लक्षात ठेवा की, ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय सरकारी सुविधांचा लाभ घेता येणार नाही.