हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फास्टॅग (FASTag) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशांची फास्टॅग खाती येथे 31 जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भात सोमवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ही सुविधा देणाऱ्या बँकांना सूचना दिल्या आहेत.
प्राधिकरणाने बँकाना म्हटले आहे की, सध्याच्या घडीला एकाच फास्टॅगचा वापर वेगवेगळ्या वाहनांसाठी केला जात आहे. परंतु एका फास्टॅगचा वापर केवळ एकाच वाहनांसाठी करण्यात यावा, या हेतूने एक वाहन एक फास्टॅग असे धोरण राबविण्यात येत आहे. यामध्ये रिझर्व बँकेच्या मार्गदर्शनानुसार फास्टॅग संबंधीत ग्राहकांनी केवायसी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागेल.
महत्वाचे म्हणजे, सध्या फास्टॅग वापरणाऱ्या वाहनांची संख्या आठ कोटींच्या वर पोहोचली आहे. अशातच एकाच वाहनांसाठी अनेक फास्टॅग काढण्यात आल्याची प्रकरणे देखील उघडकीस आली आहेत. तसेच बँकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण न करता फास्टॅग काढल्याचे प्रकार देखील घडले आहेत. यामुळे प्रत्यक्षपणे रिझर्व बँकेच्या मार्गदर्शनाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे याबाबत कठोर कारवाई करण्यासाठी एनएचएआय हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.
31 जानेवारी अंतिम तारीख
जे ग्राहक फास्टॅगचा (FASTag) वापर करत आहेत मात्र अद्याप त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशांची फास्टॅग खाती बंद करण्यात येणार आहेत. यासाठी 31 जानेवारी ही अंतिम तारीख राहील.