हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील (Pune) एका ऑटोमोबाईल कंपनीला (Automobile Company) देण्यात आलेल्या समोसामध्ये बटाटाऐवजी कंडोम, गुटखा आणि दगडी मिळाली आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका उपकंत्राटदारासह कंपनीच्या 2 कामगारांचा ही समावेश आहे. या घडलेल्या प्रकारानंतर बाहेरील हॉटेल्समध्ये खाण्याचे ऑर्डर द्यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील एका ऑटोमोबाईल कंपनीने कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे खाद्यपदार्थ पुरवण्याची ऑर्डर दिली होती. याच फर्मने एका दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. या कंत्राटानुसार, उपकंत्राटदार कंपनीने ऑटोमोबाईल कंपनीला समोस्यांची ऑर्डर पुरवली. परंतु समोसे खात असताना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगडी सापडली. यामुळे कंपनीत चांगलाच गोंधळ उडाला.
पुढे घडलेल्या या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, तीन भागिदारांना त्यांचे कंत्राट गेल्यामुळे राग आला होता. यामुळे त्यांनी ऑटोमोबाईल कंपनीला खाद्य पुरवत असलेल्या पुरवठादारांना बदनाम करण्यासाठी सर्व कट रचला. या कटामध्ये त्यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यांना नव्या कंत्राटदाराकडे कामाला लावले. यानंतर फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन कर्मचाऱ्यांनी समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगडी भरली.
दरम्यान, फिरोझ शेख आणि विकी शेख या दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, ते एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारीत आहेत. त्यांना मनोहर एंटरप्रायझेस पुरवठा करत असलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी कंपनीकडून पाठवण्यात आले होते. आरोपीने दिलेल्या या माहितीनंतर त्यांच्या विरोधात पोलिसांनी विविध कायमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.