औरंगाबाद – अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यावर्षी दहावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना बहुतांश गुण मिळाले आहेत. आता न्यायालयाने अकरावीसाठी घेण्यात येणारी सीईटी देखील रद्द केल्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. परंतु औरंगाबाद शहरातील संस्थांकडून होणारी मागणी यामुळे यंदापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करण्यात आली आहे. तर शाळा बंद असल्याने यंदा दहावीचा निकाल हा मागील इयत्तेच्या मूल्यांकन पद्धतीनुसार जाहीर करण्यात आल्याने शासनाने सीईटी परीक्षा जाहिर केली होती. मात्र न्यायालयाने सीईटी रद्द केल्याने प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
सीईटी रद्द झाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरुळीत होईल अशी अपेक्षा शहरातील महाविद्यालयांना होती. मात्र यंदा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुण मिळाले आहेत. त्यामुळे विज्ञान पाठोपाठ वाणिज्य शाखेला प्रवेशाकडे ओढा वाढलेला दिसून येत आहे. असे असूनही प्रवेशाबाबत खात्री वाटत नसल्याने आणि शाळांकडून शुल्कासाठी अजून टीसी न मिळाल्याने मुल येवून चौकशी करुन जात असल्याचे महाविद्यालयांनी म्हटले आहे. पालक – विद्यार्थी यांच्यातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशन केले जात असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
अकरावी प्रवेश ऑनलाइन की ऑफलाइन अशी संभ्रमावस्था विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आहे. शहरामध्ये अकरावीचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु पुढील आदेश मिळेपर्यंत प्रवेश निश्चिती करु नका अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मुलांमधील ही द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी प्राध्यापकाची समुपदेशन समिती गठीत केली असल्याचे प्राचार्यांनी सांगीतले.