सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सातारा जिल्ह्याचा आढावा घेण्यसाठी आलेले होते. त्यावेळी आमच्या वाई- खंडाळा मतदार संघाचे अकार्यक्षम आमदार मकरंद पाटील यांनी खोटे आकडेवारी दिलेली आहे. मतदार संघात जी काही व्यवस्था आहे, ती स्वतःच्या पैशाने आमदारांनी काही केलेली नाही. अनेक कंपन्या, सामाजिक संस्थाकडून पैसे घेवून ही व्यवस्था केलेली आहे. वाई मतदार संघात 600 बेड असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात केवळ 311 बेड असून आमदारांनी निलेश लंके होण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला देत काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे यांनी खरी आकडेवारी सांगत आव्हान दिले आहे.
सातारा जिल्हा कोरोनाच्या पादुर्भावामध्ये रेड झोनमध्ये गेला असल्याने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली होती. तेव्हा पत्रकारांनी जिल्ह्यात निलेश लंके कोणी नाही असा प्रश्न विचारला असता. वाई- खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या मतदार संघाची माहीती दिली. त्यावर विराज शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्ही दुसऱ्याच दिवशी वाई मतदारसंघातील माहीती घेतली. वाई येथे मॅप्रोच्या ठिकाणी 100 ऑक्सिजन बेडचे आणि 10 व्हेटिंलेटर व्यवस्था केल्याचे सांगितले. प्रत्यक्ष तेथे डॉक्टरांनी सांगितले केवळ 30 ऑक्सिजनचे बेड आणि 6 व्हेटिलेंटर आहेत. महाबळेश्वरमध्ये 150 ऑक्सिजन आणि 7 व्हेटींलेटर अशी असल्याचे सांगितले. तर तेथे 120 ऑक्सिजन आणि व्हेटीलेटर मिळून बेड आहेत. मग एवढा खोटारडेपणा का?
आमदारांनी बैठकीत खरी माहीती दिली असती तर उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी तातडीने मदत केली असते. वाई तालुक्यात आपण काहीच केलेले नाही. मागच्या कोरोनाच्या काळातही ॲब्युलन्ससाठी आम्ही आग्रह धरला. खंडाळा तालुक्यात आमच्या मागणीने जगताप हॉस्पीटल सारख्या ठिकाणी 65 बेड सुरू झाले. तेव्हा वाई तालुक्यातील सामान्य, गोरगरिब जनतेला कोरोनाच्या खाईत ढकलू नये. तसेच खोटे आकडे देवून निलेश लंके होण्याचा प्रयत्न करू नये, असे विराज शिंदे यांनी सांगितले.