हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabah Election) विविध पक्षांचे उमेदवार अर्ज भरत आहेत. परंतु इंदौरमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे उमेदवार अक्षय बाम (Akshay Bam) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश केला आहे. ते भाजप आमदार रमेश मेंदोला यांच्यसह उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आता इंदौर मतदारसंघात भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार उभा नसणार आहे.
महत्वाचे म्हणजे, अक्षय बाम यांच्यासह एक फोटो शेअर करत कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट केले आहे की, “इंदौरचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्या नेतृत्वातील भाजपात स्वागत आहे” या ट्विटच्या माध्यमातून विजयवर्गीय यांनी अक्षय बाम यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोट्यात हालचालींचा वेग वाढला आहे. तसेच या घडामोडीत काँग्रेस काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी इंदौर मतदारसंघातून खासदार शंकर लालवानी उभे राहिले आहेत. तर गेल्या 24 एप्रिल रोजी बाम यांनी काँग्रेसच्या बाजूने उमेदवारीचा अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी हा अर्ज पुन्हा माघारी घेतला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेत्यांनी अक्षय बाम यांच्या भूमिकेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते मुकेश नायक यांनी भाजपावर टीका करत, “हा पक्षाला खूप मोठा धोका आहे. भाजपने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत” असे म्हटले आहे.